29 Nov 2026, Sun

वेद आणि कुराणाचा संदेश एकच; प्रेम, मानवता आणि विश्वशांतीचा मार्ग महत्त्वाचा – मौलाना वहीदुल्लाह अन्सारी

वेद आणि कुराणात वैश्विक मानवी मूल्यांची शिकवण

मौलाना वहीदुल्लाह अन्सारी चतुर्वेदी यांचे विचार

एमआयटी डब्ल्यूपीयूत ३१ वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे चौथे पुष्प

पुणे, दि. २८ नोव्हेंबर : “वेद आणि कुराण या दोन्ही धर्मग्रंथांच्या शिकवणींचा मुख्य गाभा वैश्विक मानवी मूल्ये आणि नैतिकता आहे. या ग्रंथांचा मूळ गाभा प्रेम, मानवता आणि ईश्वराची उपासना आहे. परस्पर प्रेम, सामाजिक सुधारणा आणि सामाजिक सलोखा हेच वेद आणि कुराण ग्रंथातील खरे ज्ञान आहे. मानवता, प्रेम, सत्य आणि ईश्वरभक्ती ही मूल्ये दोन्हींमध्ये समान आहेत.” असे विचार लखनऊ येथील मौलाना वहीदुल्लाह अन्सारी चतुर्वेदी यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासनाअंतर्गत आयोजित ३१ वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफताना ‘वेद आणि कुराण’ या विषयावर ते बोलत होते.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे ऑनलाईन उपस्थित होते. तसेच नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, प्रो. मंजूषा आणि व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. मिलिंद पात्रे उपस्थित होते.

एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल वि. कराड यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम संपन्न होत आहे.

मौलाना वहीदुल्लाह अन्सारी चतुर्वेदी म्हणाले, “मानवतेसाठी चांगले कार्य करा, वादविवाद नकोत. धार्मिक सलोखा ही आपल्या समाज व्यवस्थेची ओळख आहे. सर्व धर्म समभाव आणि ऐक्यच विश्वशांतीसाठी पूरक आहे. आपले जीवन दुसऱ्यांच्या कल्याणासाठी अर्पित करा.”

तत्पूर्वी सकाळच्या सत्रात विनोद भिडे यांनी आपल्या वैयक्तिक आणि संस्थात्मक निवडीचे मूल्यमापन आणि जीवनातील विकासाचे तत्त्वज्ञान यावर भाष्य केले. “आपल्या वैयक्तिक आयुष्यात निवड करताना ध्येयाचे मूळ नेमके कुठे आहे याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. आपल्या ध्येयामागील प्रेरणा कोणती आहे ते तपासावे. ही प्रेरणा नैसर्गिक सहजप्रवृत्तीतून, असुरक्षिततेच्या भावनेतून की सकारात्मक विचारसरणी व विधायक दृष्टिकोनातून निर्माण झाली आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधणे म्हणजेच निवडीच्या मुळाशी असलेल्या प्रेरणांचा शोध घेणे होय. आपण आयुष्यात जे काही निर्णय घेतो, निवड करतो, त्या सर्वांचा अंतिम उद्देश प्रगती साधणे हाच असतो. व्यक्तीच्या विस्ताराची संकल्पना केवळ भौतिक पातळीवर मर्यादित राहत नाही, तर ती बौद्धिक, वैचारिक आणि आध्यात्मिक उंची गाठते.” असेही त्यांनी सांगितले.

प्रा. मिलिंद पात्रे यांनी ‘ध्यान’ या विषयावर विचार मांडले.

यावेळी प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये, डॉ. दिपेन्द्र शर्मा आणि डॉ. अनु नायर उपस्थित होते.

प्रा. अमृता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दिपेन्द्र शर्मा यांनी आभार मानले.

अधिक माहितीसाठी संपर्क:
संजय कैकाडे
जनसंपर्क विभाग,
एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे
मो. नं. 9823602884

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button