28 Nov 2026, Sat

आत्मचिंतन आणि ध्यानातूनच आंतरिक शांततेचा मार्ग सापडतो : कमांडर शिव माथूर

आत्मपरीक्षणाने आध्यात्मिक साधना फलदायी ठरते
कमांडर शिव माथूर यांचे विचार
एमआयटी डब्ल्यूपीयूत ३१ वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे तृतीय पुष्प

पुणे, दि. २७ नोव्हेंबर : “आत्मचिंतनाशिवाय कोणतीही आध्यात्मिक साधना केवळ एक वरवरचा देखावा किंवा यांत्रिक व्यायाम ठरते. आंतरिक जागरूकता आणि आत्मपरीक्षण हेच आध्यात्मिक साधनेला खरा अर्थ देतात. आपले विचार, भावना आणि खरे स्वरूप समजून घेतले तेव्हाच आध्यात्मिक साधना फलदायी ठरते.” असे विचार कमांडर (सेवानिवृत्त) शिव माथूर यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासनाअंतर्गत आयोजित ३१ वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे तृतीय पुष्प गुंफताना ‘आध्यात्मिक शोध’ या विषयावर ते बोलत होते.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे ऑनलाईन उपस्थित होते. तसेच व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. मिलिंद पात्रे उपस्थित होते.

एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल वि. कराड यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम संपन्न होत आहे.

शिव माथूर म्हणाले, “अध्यात्माचा खरा प्रवास स्वतःच्या अंतर्मनाचा शोध घेण्यात आहे. हा शांतता अनुभवण्याचा एक प्रवास आहे. यात स्वतःमध्ये सकारात्मक परिवर्तन घडविले जाते. अध्यात्माबद्दल समाजात अनेक गैरसमज आणि गोंधळ आहेत. त्यामुळे अंधानुकरण न करता, प्रत्यक्ष ध्यान आणि आत्मपरीक्षणाद्वारे स्वतः सत्य अनुभवणे महत्त्वाचे आहे. मनाची अस्थिरता समजून घेऊन त्याला शांत, स्थिर आणि सकारात्मक बनवणे ही ध्यानसाधनेची महत्त्वाची प्रक्रिया आहे. आध्यात्मिकता केवळ धार्मिक विधी किंवा परंपरा नाही, तर आपल्या विचारांमध्ये, वर्तनांमध्ये आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडविणे आहे.”

“आपल्या शरीरात प्रचंड ऊर्जा आहे. ती ऊर्जा नकारात्मक विचारांत अधिक वाया जाते. सकारात्मक ऊर्जा सकारात्मक कार्यासाठी कार्यान्वित करण्यासाठी ध्यान महत्त्वपूर्ण आहे. ध्यान हेच मनाची साधना असावी. पेहरावावरून कोणी योगी होत नाही. साधना, ध्यान आणि अध्यात्मातून योगी बना. आपले आयुष्य कसे जगायचे हे आपणच ठरवू शकतो.”

सकाळच्या सत्रात प्रसिद्ध सर्जन डॉ. उत्क्रांत कुर्लेकर म्हणाले, “ताणतणावातही शांत राहून काम करा. कठीण निर्णय घेण्यापूर्वी मानसिक स्पष्टता ठेवा. शारीरिक व्यायामामुळे मानसिक स्पष्टता येते. तणाव व्यवस्थापनासाठी मदत होते.” तसेच लहान मुलांच्या संदर्भाने पुढे बोलताना ते म्हणाले की, “स्क्रीन टाईममधून मुलांना बाहेर काढण्यासाठी त्यांना चांगल्या सवयी लावा. शारीरिक व्यायामाची त्यांच्यामध्ये आवड निर्माण करा.”

त्यानंतर सागर कुंभारे यांनी ‘डिजिटल लर्निंग हे केवळ शिक्षणाचे साधन नसून व्यक्तिमत्त्व विकास, संशोधन, रोजगारक्षमता आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम बनते. कृत्रिम बुद्धिमत्तेपासून ते आंतरिक बुद्धिमत्तेपर्यंतचे डिजिटल शिक्षण आज शिक्षण क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.’ असे सांगितले. तसेच डॉ. संजीवनी कुलकर्णी यांनी ‘ज्ञान, तंत्रज्ञान आणि मानवी मूल्यांचे एकत्रीकरण गरजेचे आहे’ या विषयावर विचार मांडले.

यावेळी डॉ. पंकज कोपर्डे, डॉ. अभिजित सुतार, डॉ. बालाजी पाटील आणि डॉ. सुप्रिया पायगुडे उपस्थित होते.

कुणाल मराठे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. वैभव वाघ यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button